Join us  

शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 6:53 AM

किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्यावर पुढे कारवाई करणार का, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना अखेरची संधी दिली. 

मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर २०२१  मध्ये मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रद्द करण्यासाठी शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे व आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे होती.

राजकीय हेतूने आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे. पालिकेचा भोंगळ कारभार लोकांसमोर आणण्यासाठी ४ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बीडीडी चाळीत घडलेल्या दुर्घटनेवेळी मुंबईच्या महापौर तिथे उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. महापौरांचा अपमान करण्याचा शेलार यांचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद शेलार यांच्यावतीने ॲड. रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात केला.

त्यानंतर  उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांकडे याबाबत काही सूचना आहेत का, अशी विचारणा केली. हे प्रकरण पुढे चालवणार का, असा प्रश्न सरकारी वकील जयेश याज्ञिक यांच्याकडे केला. त्यावर याज्ञिक यांनी न्यायालयाला माहिती दिली की, न्यायालयाने शेलार यांच्यावर आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश दिले, त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. त्यावर शेलार यांच्याविरोधातील गुन्ह्यासंदर्भात पुढे कारवाई करणार की नाही, याबाबत ठाम भूमिका मांडण्याचे निर्देश पोलिसांना देत न्यायालयाने पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी ठेवली.

टॅग्स :आशीष शेलारउच्च न्यायालय