परवानगीशिवाय उभारलेल्या मंडपांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 02:12 AM2018-08-05T02:12:01+5:302018-08-05T02:12:17+5:30
उत्सव काळात विविध परवानग्यांसाठी बराच कालावधी लागत असल्याने, अनेक वेळा गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळे मंडप बांधून झाल्यानंतर परावानगीची प्रक्रिया पूर्ण करतात.
मुंबई : उत्सव काळात विविध परवानग्यांसाठी बराच कालावधी लागत असल्याने, अनेक वेळा गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळे मंडप बांधून झाल्यानंतर परावानगीची प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, यंदापासून सर्व आवश्यक परवानग्या सात दिवसांत आॅनलाइन देण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे. त्यामुळे कोणत्याही विभागात विनापरवानगी मंडप उभे राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
पालिका मुख्यालयात आयोजित मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी असे आदेश दिले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेबरोबरच वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस, अग्निशमन दल अशा विविध ठिकाणांहून परवानगी घ्यावी लागते असे. त्यामुळे विलंब होऊन गणेशोत्सव सुरू झाल्यानंतरही अनेक मंडळांच्या हातात परवानगीपत्र नसायचे. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी मंडळांच्या मागणीनुसार मंडप व प्रवेशद्वार उभारणीसाठी आवश्यक परवानगीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या बाबी सुस्पष्टपणे नमूद करून अर्ज फेटाळावा. अर्ज फेटाळण्याची कारणे संबंधितांना सुस्पष्ट कळवावीत, कुठलाही अर्ज प्रलंबित ठेऊ नये, असे आदेश सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांना आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मंडपविषयक परवानग्या देण्यात याव्यात, तसेच विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आयुक्तांनी सहायक आयुक्तांना बजावले आहे.
>अर्जासाठी मिळणार सहकार्य
मंडप व प्रवेशद्वार परवानग्यांची प्रक्रिया या वर्षीपासून आॅनलाइन करण्यात आली आहे. मात्र, आॅनलाइन पद्धतीने अर्ज करताना अर्जदारांना काही अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेता, सर्व विभाग कार्यालयांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून आॅनलाइन अर्ज भरून घ्यावेत. यासाठी परवानग्यांशी संबंधित काम बघणाºया कर्मचाºयांनी कामकाजातील दररोज एक तास राखून मंडळांच्या पदाधिकाºयांना सहकार्य करावे, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे.
>अग्निसुरक्षेचे नियम बंधनकारक
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप व प्रवेशद्वाराची उभारणी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून केली असल्याची खातरजमा करून घेण्यात येणार आहे.
मेट्रोशी समन्वय साधणार
मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो, एमएमआरडीएची कामे सुरू आहेत. यासाठी मेट्रो अधिकारी आणि पोलीस दलाशी समन्वय साधावा. स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व पोलीस दल यांच्या आवश्यकतेनुसार संयुक्त बैठका आयोजित करून, समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
>परदेशी पाहुण्यांचे स्वागत
गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी यांसारख्या गणेश मूर्ती विसर्जनाच्या महत्त्वाच्या ठिकाणी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परदेशी पाहुण्यांकरिता चौपाट्यांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.