चुकीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

By admin | Published: February 21, 2016 02:19 AM2016-02-21T02:19:45+5:302016-02-21T02:19:45+5:30

मुलुंड येथील एका डॉक्टरचे एका महिन्यासाठी निलंबन करण्याचा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेतला आहे. कर्करोग झाला आहे, असे सांगून एका रुग्णाचे मोठे आतडे काढून

Action on the wrong surgical doctor | चुकीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

चुकीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

Next

मुंबई : मुलुंड येथील एका डॉक्टरचे एका महिन्यासाठी निलंबन करण्याचा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेतला आहे. कर्करोग झाला आहे, असे सांगून एका रुग्णाचे मोठे आतडे काढून टाकल्यामुळे डॉक्टरविरोधात रुग्णाने परिषदेकडे तक्रार नोंदविली होती.
मुलुंड येथील शुश्रूषा रुग्णालयात हा प्रकार घडला. २०१२ मध्ये चंद्रकांत कुलकर्णी हे शुश्रूषा रुग्णालयात उपचारांसाठी गेले होते. त्या वेळी डॉ. नितीन रहाणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. उपचाराआधी त्यांनी कुलकर्णी यांच्या काही तपासण्या केल्या. त्यानंतर कुलकर्णी यांना कर्करोग झाल्याचे सांगितले. कर्करोग झाला असल्यामुळे तुमच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी कुलकर्णी यांना सांगितले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने २३ आॅगस्ट २०१२ रोजी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. या वेळी त्यांनी कुलकर्णी यांचे मोठे आतडे काढले. शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाली. त्यानंतर कुलकर्णी यांना जबरदस्तीने फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. कुलकर्णी यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. पुढचे काही महिने त्यांच्यावर अतिदक्षता विभागातच उपचार सुरू होते. त्यानंतर कुलकर्णी यांनी दुसऱ्या डॉक्टरकडून तपासणी करून घेतली असता चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आल्याने कुलकर्णी यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार नोंदवली. डॉ. रहाणे यांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ देण्यात आला होता. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिषदेच्या तज्ज्ञ मंडळाने या प्रकरणाचा ऊहापोह केल्यानंतर डॉ. रहाणे यांच्याकडे उत्तर मागितले होते. पण त्यांनी काहीच उत्तर न देता वेळ मागून घेतली. पण तरीही दोन महिने होऊनही उत्तर दिले नाही. त्यामुळेच एका महिन्यासाठी त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Action on the wrong surgical doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.