मुंबई : भरधाव वेगात असलेल्या एका अॅक्टिव्हा गाडीने भररस्त्यात पेट घेतल्याची घटना मंगळवारी सायन येथे घडली. तेव्हा तेथे असलेल्या एका वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान दाखवत पाण्याच्या साह्याने ही आग विझवली. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले नाही, शिवाय जीवितहानीदेखील टळली. धारावी परिसरात राहाणारे हैदर अली यांच्या मालकीची ही (एमएच ०१, एजी ७१२७) गाडी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गाडीत काही बिघाड असल्याने, ते सायन परिसरात दुरुस्तीसाठी गाडी घेऊन गेले होते. गाडी दुरुस्त झाल्यानंतर धारावीकडे येत असताना, सायन हॉस्पिटल जंक्शन सिग्नलवर अचानक गाडीमधून धूर येऊ लागला. एका वाहन चालकाने त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. गाडी रस्त्यातच थांबवून ते थोडे दूर गेले. त्यानंतर, काही क्षणातच गाडीने पेट घेतला. ही बाब तेथे ड्युटीवर असलेल्या माटुंगा वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद सूळ यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. मात्र, अग्निशमन दलाच्या गाडीला पोहोचण्यास उशीर होत असल्याचे पाहून, सूळ यांनी रस्त्यावरून जात असलेला एक पाण्याचा टँकर अडवत, टँकरमधील पाण्याने गाडीवर फवारा केला. त्यामुळे ही आग तत्काळ विझली. या घटनास्थळापासून पेट्रोल पंप हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, पोलिसांच्या या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळल्याचे वाहनचालकांनी बोलून दाखविले. (प्रतिनिधी)
भररस्त्यात अॅक्टिव्हा पेटली
By admin | Published: April 19, 2017 1:01 AM