मुंबई : मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. सध्या चार हजार ६५४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत, मात्र रुग्णसंख्येत अधूनमधून वाढ दिसत असली तरी मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन दर एक टक्क्याहून कमी असल्याने चिंतेची गरज नाही. मात्र खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. मात्र मागील महिन्यापासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. दररोज रुग्णसंख्या २५० ते ३०० वर आली होती. परंतु पुन्हा काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या ४५० ते ५०० वर पोहोचली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही आता अडीच हजारांवरून चार हजार ६५४ वर पोहोचली आहे. यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या सात लाख ३६ हजार ७७० एवढी आहे. यापैकी ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र एकीकडे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत १६ हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६० वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पालिकेने चाचणीचे प्रमाणही वाढवले आहे. मात्र त्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी आढळून येत आहे.