मुंबई - नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभेत मोठा गदरोळ झाल्यानंतर भाजप आमदारांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेत एका भाजप स्थानिक नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पाटणा येथील डाकबंगला चौकात पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून कार्यकर्त्याच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे.
बिहारच्या जहानाबाद शहरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये विजय जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर बिहारमधील राजकारण चांगलेच तापले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ट्विट करुन नितीशकुमार यांच्या सरकारला लक्ष्य केलं. आता, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, भाजप पदाधिकाऱ्याच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला.
बिहारमध्ये राज्य सरकारने केलेल्या निर्दयी लाठीचार्जमध्ये आमच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. ज्या भूमीवरुन लोकशाहीचा आवाज बुलंद झाला, त्याच भूमीवर अधिकारशाही निती वापरली जात असल्याचा मी निषेध करतो. भाजपा सरकारने आपला नाकर्तेपणा लपविण्याचे लाख प्रयत्न करावे, पण भाजपा आपला संघर्ष सुरूच ठेवेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
जेपी नड्डा यांचेही ट्विट
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट केले आहे. नड्डा म्हणाले, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि रागाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही नैतिकतेचा विसर पडून आरोपपत्र झालेल्या व्यक्तीला वाचवले आहे.
दरम्यान, बिहार विधानसभेत शिक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजप सदस्यांनी वेल येथे पोहोचून सरकारला घेराव घातला आणि निदर्शने केली, त्यामुळे भाजपच्या दोन आमदारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रॅली काढणाऱ्या आमदार आणि नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. नितीश सरकारविरोधात भाजपने गुरुवारी विधानसभेत मोर्चा काढला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना बडतर्फ करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.