Join us  

‘सोमय्याराज’मुळे कार्यकर्ते नाराज

By admin | Published: February 03, 2017 3:51 AM

पक्षातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नुकताच पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची पालिकेच्या तिकिटासाठी वर्णी लागल्याने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून

- मनीषा म्हात्रे, मुंबई

पक्षातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नुकताच पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची पालिकेच्या तिकिटासाठी वर्णी लागल्याने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. उत्तर पूर्व मुंबईमध्ये ‘सोमय्याराज’ असल्याचा आरोप करत अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निवडणुकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत भाजपाला पक्षांतर्गत नाराजीचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.भाजपाच्या पहिल्या यादीत जाणूनबुजून उत्तर भारतीय उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून या विभागात ‘सोमय्याराज’ सुरू असून मुलगा नील याला आमदारकीला उभे करण्यासाठी त्यांनी आधीपासून तयारी सुरू केली होती. पक्षाचे आमदार तारासिंग यांच्यानंतर आमदारकीचा प्रबळ दावेदार असलेल्या भाजपा नगरसेवकाला मुलुंडमधून न लढविता भांडुपमधून लढविले होते. त्या वेळेस भांडुपच्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचे सूर उमटले. एकाने बंडखोरी केल्याने भांडुपमध्ये सेनेचा आमदार निवडून आला होता. पालिका निवडणुकीतही अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याचे एका भाजपा पदाधिकाऱ्याने सांगितले. मुलुंड भांडुपमध्ये भाजपाचा गड सांभाळण्याचे काम केले असताना आपण सांगितलेल्या एकाही उमेदवाराला तिकीट देण्यात आले नसल्याची खंत तारासिंग यांनी या वेळी बोलून दाखविली. काँग्रेस आमदार भाजपाच्या वाटेवर - घाटकोपरमधील काँग्रेस आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर त्यांच्या विश्वासातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार असल्याने त्यालाही भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध आहे. या प्रकरणात खासदार आणि घाटकोपर भाजपा आमदार मध्यस्थी करत आहेत. त्यामुळे येत्या काही काळात भाजपाची अंतर्गत धुसफूस वाढली आहे. त्यातच बुधवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांंना मुलुंडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापात आणखीन भर पडली आहे.के.टी. थापाच्या बहिणीला उमेदवारीअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि भांडुप शिवसेनेचा लोकप्रिय नगरसेवक के.टी. थापा याची गँगवॉरमधून हत्या झाली होती. त्यानंतर त्याची बहीण सीता मुखीया या शिवसेनेत दाखल झाल्या. शिवसेनेच्या माजी महिला उपविभाग प्रमुखपदी कार्यरत होत्या. त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामधून त्यांना ११३ साठी उमेदवारी मिळाली आहे. भाजपा उमेदवार मीरा दीक्षितांची माघार टळलीभांडुपच्या ११६ मधून आनंद दीक्षित यांची पत्नी मीरा दीक्षित यांना भाजपामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आनंद दीक्षित यांनी चार महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र याच ठिकाणी भाजपाच्या प्रतिभा लाटकर या जुन्या कार्यकर्त्या असून त्यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडून त्यांना विरोध करण्यात आला, तर काहींनी अपक्ष लढून जिंकून दाखविण्याचे आव्हान दिले होते. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे मीरा यांनी उमेदवारी मागे घेण्याचा पवित्रा घेतला होता. गुरुवारी अर्ज भरला नाही. त्यांना समजविण्यासाठी खासदारांनी मध्यस्थी केली. अखेर समजविल्यानंतर मीरा दीक्षितांनी लढण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. या प्रकरणी आनंद दीक्षित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्कात येऊ शकले नाहीत.