मुंबई - राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीकडून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज ईडी कार्यालयात शरद पवार स्वत:हून हजर राहणार असून कर नाही तर डर कशाला, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षिण मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांना विनाकारण आरोप करुन नाव बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पवारांना जो प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण सुरु आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही शरद पवार गेले तरी लाखो लोकं त्यांचे स्वागत करत आहे. त्यातून ही कारवाई केली. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. राष्ट्रवादी शिस्तबद्ध पक्ष आहे, कोणताही गोंधळ न करता निषेध नोंदवावा, महाराष्ट्रभर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लाखो कार्यकर्ते मुंबईत येण्याचा प्रयत्न करतायेत. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं, कुठेही गोंधळ करु नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
तसेच सरकारने कलम 144 लागू करुन सुरक्षेचा अतिरेक केला आहे. कायदा न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ईडीच्या कारवाईला शरद पवार सहकार्य करतायेत. शरद पवार कोणत्याही संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन खोटेनाटे आरोप केले जात आहे हे सहन केले जाणार नाही असा इशाराही जयंत पाटील यांनी भाजपाला दिला आहे.
दरम्यान, ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी.त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे असं आवाहन शरद पवारांनीही केलं आहे.