विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काल अधिवेशनाचा नववा दिवस होता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी सांगली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळांबाबत राबवण्यात आलेल्या उपक्रमाचीही चर्चा झाली. हा उपक्रम आपण राज्यात सगळीकडे राबवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात 'माझी शाळा आदर्श शाळा' व 'स्मार्ट पीएचसी' हे उपक्रम राबवविले. हे उपक्रम यशस्वी ठरले असल्याने संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली.
काय आहे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पीएचसी उपक्रम ?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्या काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणले. त्यातील दोन महत्वाचे उपक्रम म्हणजे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पीएचसी उपक्रम.
जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आधी गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य कर्मचारी भरती अशा विविध गोष्टी केल्या गेल्या.
या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे तर तसेच ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
आता शासनातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार असल्याने अख्या राज्यात जयंतराव पाटील पॅटर्न राबवला जाणार अशी चर्चा आहे.