‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:17 AM2024-06-13T09:17:38+5:302024-06-13T09:18:08+5:30

Health News: कर्करोगाच्या उपचारावर सध्याच्या प्रचलित उपचार पद्धतीमाध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देण्यात येते. मात्र, काही रुग्णांच्या बाबतीत रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होऊन त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

'Actocyte' will make radiotherapy more tolerable, with fewer side effects in the market; Accreditation of FSSAI | ‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता

‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता

 मुंबई - कर्करोगाच्या उपचारावर सध्याच्या प्रचलित उपचार पद्धतीमाध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देण्यात येते. मात्र, काही रुग्णांच्या बाबतीत रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होऊन त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या अशा दुष्परिणामांची दाहकता कमी करण्यासाठी अनेक दशकांचा अभ्यास करून संशोधक आणि कर्करोग तज्ज्ञांनी ‘ॲक्टोसाइट’ नावाचे औषध विकसित केले आहे. त्याला अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) मान्यता दिल्याने ते आता बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बंगळुरू येथील आयडीआरएस लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मेमोरियल सेंटर आणि अणुऊर्जा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. किमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे कर्करोग बरा होतो, मात्र उपचारांच्या दुष्परिणांमुळे रुग्णांना अन्य आजारांचा सामना करावा लागतो. ‘ॲक्टोसाइट’ या औषधामुळे रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते तसेच अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे अनेक रोगांचा धोका कमी होऊ शकतो.

टाटा मेमोरियल सेंटरच्या अखत्यारीतील रुग्णालयाने औषधाच्या क्लिनिकल ट्रायल घेतल्या असून, त्यांना चांगले परिणाम दिसून आले आहेत. विशेष म्हणजे, या औषधामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास रुग्णांना झालेला नाही. त्यामुळे या औषधाला मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, शरीराला पोषण मूल्ये देण्याचा दावा करणारे औषध (न्यूट्रास्युटिकल्स) असल्याने ते बाजारात सहजपणे उपलब्ध होणार आहे. यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाला एक गोळी जेवण करण्याच्या एक तास आधी घ्यावी लागणार आहे. एका गोळीची किंमत ही १४० ते १७० रुपयांदरम्यान असून, त्या गोळीच्या प्रमाणावर त्याची किंमत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किती महिने या गोळ्या घ्यावात, हे निश्चित करता येणार आहे.

हे औषध बाजारात उपलब्ध करून देण्याप्रसंगी भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, खारघर येथील ऍक्टरेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी आणि अणुऊर्जा विभाग आणि आयआरडीएस प्रयोगशाळेचे संशोधक उपस्थित होते.

काय आहे ‘ॲक्टोसाइट’?
     मलबेरीच्या पानातून काढलेल्या अर्काद्वारे (क्लोरोफिलीन) हे औषध विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये सोडियम आणि कॉपरचा समावेश आहे. 
     गोळ्यांच्या स्वरूपात औषध तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय विश्वात या विषयावर आतापर्यंत ३०९ शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. 

ओटीपोटातील कर्करोग (पेल्विक कॅन्सर) म्हणजे महिलांना होणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि पुरुषांना होणारा प्रोस्टेट कर्करोग. या कर्करोगाच्या उपचारांत रेडिओथेरपी घेतलेल्या काही रुग्णांमध्ये दुष्परिणाम आढळतात. त्यामुळे काही रुग्णांच्या लघवीतून रक्त जाते. या अशा आजाराच्या उपचारातून लवकर बरे होण्यासाठी या ‘ॲक्टोसाइट’ औषधाचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

Web Title: 'Actocyte' will make radiotherapy more tolerable, with fewer side effects in the market; Accreditation of FSSAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.