अभिनेता आदित्य पांचोलीला धमकीचा फोन, मागितली 25 लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 08:16 AM2017-10-22T08:16:01+5:302017-10-22T08:25:52+5:30
अभिनेता आदित्य पांचोलीचा तक्रार अर्ज आम्हाला मिळाला आहे. आम्ही चौकशी करत आहोत.
मुंबई - २५ लाखांची खंडणी देण्यासाठी काही दिवसांपासून फोन व मेसेज येत असल्याची तक्रार अभिनेता आदित्य पांचोली याने वर्सोवा पोलिसांकडे केली आहे. मुन्ना पुजारी या नावाने धमक्या देण्यात आल्या असल्याचे त्याने अर्जात नमूद केले आहे.
आदित्य पांचोलीला १८ ऑक्टोंबरला मोबाइलवर फोन आला. मुन्ना पुजारी बोलत असल्याचे सांगून शिव्या देत २५ लाखांची मागणी केली. त्यानंतर एका बँकेचा अकाउंट नंबर देऊन त्यावर रक्कम भरण्याबाबतचा मेसेज पाठविण्यात आला. पहिल्या फोनकडे दुर्लक्ष केल्यानंतरही फोन व मेसेज येत असल्याने आदित्य पांचोलीने शनिवारी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
अभिनेता आदित्य पांचोलीचा तक्रार अर्ज आम्हाला मिळाला आहे. आम्ही चौकशी करत आहोत. अजून एफआयआर दाखल केलेला नाही असे वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकही सक्रीय झाले असून त्यांनीही समांतर तपास सुरु केला आहे.
मुन्ना पुजारी हे पोलिसांसाठी नवीन नाव आहे असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी रवी पुजारीच्या नावाने अनेक बिल्डर, बिझनेसमनला धमकीचे फोन गेले आहेत. बॉलिवूडमध्येही रवी पुजारीने काही जणांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या नावाची दहशत ठेवण्यासाठी रवी पुजारी परदेशात राहून फोन कॉल्स करतो.