अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:06 AM2021-04-24T04:06:22+5:302021-04-24T04:06:22+5:30
अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र ...
अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अंधेरी (प.) जुहू गल्ली परिसरात ते आईसोबत राहत होते.
मिस्त्री यांचे व्यवस्थापक महर्षी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना कोणताही आजार नव्हता. सकाळी नाश्ता केल्यानंतर त्यांनी नेहमीसारखा व्यायाम केला. त्यानंतर ते आपल्या खोलीत गेले. पुढे काही वेळाने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अमित मिस्त्री यांनी गुजराती नाटकांपासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर गुजराती सिनेमा, हिंदी मालिका, वेबसिरीज आणि हिंदी सिनेमे अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली. ‘क्या कहना’, ‘१.४० की लास्ट लोकल’, ‘९९’, ‘शोर इन द सिटी’, ‘यमला पगला दिवाना’, ‘बे यार’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्याशिवाय ‘तेनाली रामा’, ‘वो’, ‘शुsss... कोई है’ अशा काही लोकप्रिय मालिकांतही त्यांनी काम केले. कोरोनाकाळात प्रदर्शित झालेल्या ‘बंदीश बँडीट’ या वेबसिरीजमुळे ते घराघरात पोहोचले. त्यांच्या निधनाबद्दल गुजराती आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले.
..............................