Join us

कोरोना विरुध्द लढ्यात अभिनेता अनिल कपूर मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 6:33 PM

महापालिकेच्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाय योजनांबरोबरच राज्य सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम मंगळवारपासून सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन लोकांचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सर्व नियम पाळून कोरोनाला मात देण्यासाठी पालिकेला साथ द्या, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी केले आहे.

१ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन दोन- तीन महिने कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल करावा व त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे सहकार्य करण्यासाठी अनिल कपूर यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईकरांना आवाहन करणारा त्यांचा व्हिडिओ पालिकेने ट्विट केला आहे.

या मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्राची साथ आहे. मुंबईतही प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या मोहिमेत पालिकेला सहकार्य करावे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने घालून दिलेले नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाला मात देण्यासाठी ही मोहीम महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्या, अशी कळकळीची विनंती अनिल कपूर यांनी मुंबईकरांना केली आहे. 

टॅग्स :अनिल कपूरकोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिकाबॉलिवूड