Join us  

रिव्हॉल्वरचे लॉक अडकलं अन्...; अभिनेता गोविंदाला गोळी कशी लागली?

By गौरी टेंबकर | Published: October 01, 2024 11:02 AM

अभिनेता गोविंदाला मंगळवारी पहाटे त्याच्या बंदुकीमधून गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

Actor Govinda Bullet Injury : शिवसेना नेते आणि अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची घटना समोर आली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी लागल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला. पहाटेच्या सुमारास त्याच्या घरी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पायाला गोळी लागल्यामुळे गोविंदाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रिया करुन गोविंदाच्या पायातील गोळी काढण्यात आली असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेता गोविंदा याने प्रतिक्रिया देताना सर्व चाहत्यांनी त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.

मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. अनावधानाने गोविंदाकडून परवानाधारक  बंदुकीतून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली. या घटनेनंतर गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अभिनेता गोविंदाने एका ऑडिओ क्लिपमधून सर्वांचे आभार मानले आहेत.

"तुमच्या सगळ्यांचे, आई वडिलांचे आशीर्वादामुळे मी वाचलो आहे. मला गोळी लागली होती पण ती आता काढली आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठीही धन्यवाद," असे गोविंदा या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहे. 

गोविंदा हा जिमला जाण्यापूर्वी त्याची लायसन्स रिव्हॉल्वर साफ करताना त्याचे लॉक अडकले होते. त्याची सफाई करतानाच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता पोलीस घरात उपस्थित असलेल्या सदस्यांचे जबाब नोंदवणार असल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी अभिनेता गोविंदाच बंदूकही आपल्या ताब्यात घेतली आहे. पोलिसांचे पथक गोविंदाच्या घरी पंचनामा करण्यासाठी पोहोचलं आहे.

टॅग्स :मुंबईगोविंदामुंबई पोलीसबॉलिवूड