अभिनेत्री ईशा कोपीकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 08:41 PM2019-01-27T20:41:47+5:302019-01-27T20:42:19+5:30
निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच भाजपने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे.
मुंबई - निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच भाजपने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा दुपारी पार पडला. याच वेळी सिनेअभिनेत्री ईशा कोपीकरचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तीचे पक्षात स्वागत केले.
या सोहळ्याला संघटनेचे प्रमुख आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हन हे उपस्थित होते. वाहतुकदारानी सुरक्षित, फायदेशीर, प्रदूषण मुक्त वाहतूक करावी, यासाठी भाजप सरकारने नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून जलवाहतूक वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.