Join us

वयाच्या 75 व्या वर्षी अभिनेते जितेंद्र यांच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा, मामेबहिणीनेच केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:15 AM

ज्येष्ठ चित्रपट अभिनेता जितेंद्र यांनी ४७ वर्षांपूर्वी आपला लैंगिक छळ केला होता अशी तक्रार त्यांच्या मामेबहिणीने हिमाचल प्रदेशच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. मात्र अभिनेता जितेंद्र यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट अभिनेता जितेंद्र यांनी ४७ वर्षांपूर्वी आपला लैंगिक छळ केला होता अशी तक्रार त्यांच्या मामेबहिणीने हिमाचल प्रदेशच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. मात्र अभिनेता जितेंद्र यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.जितेंद्र यांच्या मामेबहिणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सिमला येथे १९७१च्या जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला. त्यावेळी आपले वय १८ वर्षे व जितेंद्र यांचे वय २८ वर्षे होते. त्यावेळी सिमला येथे जितेंद्र यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटाच्या सेटवर मी त्यांना भेटायला यावे म्हणून नवी दिल्लीहून सिमल्यापर्यंतच्या माझ्या प्रवासाची सोय जितेंद्र यांनी केली होती. सिमल्याला रात्री पोहोचले त्यावेळी जितेंद्र तिच्या रुमवर गेले व तिथे त्यांनी लैंगिक छळ करण्याचा प्रकार केला, असेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मात्र अभिनेते जितेंद्र यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, जितेंद्रच्या मामेबहिणीने हिमाचल प्रदेश पोलिस महासंचालकांना इ-मेल पाठवून ही तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अजून एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. अभिनेता जितेंद्र यांच्या वतीने त्यांचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तक्रारदार महिलेने केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा आहे. एखादा गुन्हा किंवा गैरप्रकार घडल्यास त्याची तक्रार तीन वर्षांच्या केल्यास त्या प्रकरणाचा योग्य तपास करणे शक्य होते. तक्रार करण्याबद्दलचा मर्यादाकाल कायद्याने ठरवून देण्यात आलेला आहे. हा आरोप एकतर ४७ वर्षांच्या कालावधीनंतर करण्यात आला आहे. त्यामुळे तो कोणत्याही न्यायालयात टिकणार नाही किंवा तपास यंत्रणा त्या आरोपाचा गांभीर्याने विचार करणार नाही. जितेंद्र यांच्यासारख्या नामवंत व्यक्तीला तसेच त्यांच्या कंपनीला बदनाम करण्यासाठी हे सारे चालले आहे, असेही या निवेदनात पुढे म्हटले आहे.