अभिनेता जितेंद्रच्या भावाची आत्महत्या
By Admin | Published: March 15, 2017 02:54 AM2017-03-15T02:54:28+5:302017-03-15T02:54:28+5:30
सिनेअभिनेता जितेंद्रच्या ५८ वर्षांच्या चुलत भावाने गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अंधेरीत घडली
मुंबई : गेल्या १८ वर्षांपासून बेरोजगार असल्याने दीड वर्षापूर्वी तणावग्रस्त झालेल्या सिनेअभिनेता जितेंद्रच्या ५८ वर्षांच्या चुलत भावाने गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अंधेरीत घडली. या घटनेमुळे सिनेजगतातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बॉलीवूडमध्ये निर्माता म्हणून काम करत असलेले नितीन कपूर हे सिने अभिनेते जितेंद्र कपूर यांचे चुलत भाऊ आहेत. ‘हॅण्ड्स अप’, ‘मेरा पती सिर्फ मेरा है’, ‘कालीकलम’ या हिंदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. १९८५मध्ये एकत्र काम करीत असताना सिने अभिनेत्री जयासुधा यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना निहार आणि श्रेयान नावाची दोन मुले आहेत. आंध्र प्रदेशच्या २००९मधील आमदाराच्या निवडणुकीत जयासुधा या काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. मात्र २०१४च्या तेलंगणाच्या निवडणुकीत त्यांचा पराजय झाला.
गेल्या १८ वर्षांपासून ते बेरोजगार होते. ते अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला येथील सी-ग्लीम्समध्ये राहत असलेल्या बहिणीसोबत राहत होते. बेरोजगारीमुळे ते गेल्या दीड वर्षापासून तणावात होते. त्यांच्यावर महिनाभरापासून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ६ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात बेरोजगारीच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. घटनास्थळावरून कुठल्याही स्वरूपाची सुसाईट नोट मिळालेली नाही. (प्रतिनिधी)