Join us

अभिनेता जॉन अब्राहमची मावशी रोज देते ४५ मांजरांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:06 AM

ग्रॅण्ट राेड येथे वास्तव्य; अनेक वर्षांपासूनचा दिनक्रमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची मावशी गाेव्हेर या ...

ग्रॅण्ट राेड येथे वास्तव्य; अनेक वर्षांपासूनचा दिनक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची मावशी गाेव्हेर या दररोज सकाळी ग्रँटरोड परिसरातील सुमारे ४० ते ४५ भटक्या मांजरांना जेवण देते. केवळ प्राणीप्रेमापोटी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम सुरू आहे. भटक्या माजरांना कोणत्याही प्रकाराची हानी पोहोचू नये म्हणून येथे नमोनम: बहुद्देशीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था त्यांना या कामी मदत करत आहे. महत्त्वाचे म्हणजे या संस्थेने मावशीला कोरोना योद्धा म्हणूनही गौरविले आहे.

नमोनम: बहुद्देशीय संस्थेचे विक्रम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड कलाकार जॉन अब्राहम यांच्या मावशी गाेव्हेर या ग्रँट रोड येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दररोज सकाळी न चुकता परिसरातील भटक्या मांजरांसाठी जेवण घेऊन जातात. त्या दिसताच त्यांच्याभोवती मांजरांचा गोतावळा जमा होत आहे. येथील सर्व भटक्या मांजरी त्यांच्याभोवती गोळा होत असतानाच येथील भटके श्वानही गोळा होत असून, या भटक्या श्वानांना खाऊ देण्याचे काम नमोनम: बहुद्देशीय संस्थेकडून केले जात आहे.

मुळात प्राणी, पक्ष्यांवरील दया, प्रेम या भावनेतून भटक्या माजरांसह श्वानांना जेवण दिले जात आहे. अनेक वेळा भटक्या श्वानांना, मांजरांना अपघात होतात. त्यांना मारहाण केली जाते. अनेकदा वाहनांखाली आल्याने ती अपंग होतात, तर अनेकदा स्थानिकांकडूनही त्यांना इजा केली जाते. मुक्या प्राण्यांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांना खाद्य देता यावे, एवढाच प्रामाणिक उद्देश आहे, असे नमोनम: बहुद्देशीय संस्थेने सांगितले.

---------------------------