कवी म्हणून समाजाने अजूनही स्वीकारले नाही, अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 08:21 AM2023-11-05T08:21:53+5:302023-11-05T08:22:10+5:30
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात अभिनेते किशोर कदम यांच्याशी राजीव श्रीखंडे यांनी गप्पा मारल्या. याप्रसंगी, कवी म्हणून आपण झालेला प्रवास, सत्यजित दुबे यांच्याकडे घेतलेले अभिनयाचे धडे याचा प्रवास उलगडला.
मुंबई : लहानपणापासूनच माझं ऐकायला आणि माझ्याशी बोलायला कोणी नव्हतं, त्यातून माझ्यातल्या कवीचा जन्म झाला. आता समाजाने कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे, एका वेगळ्या गांभीर्याने कवितेकडं पाहिलं पाहिजे. कवितेखेरीज कथा, कादंबरी लिहाविशी वाटते; मात्र, अजूनही समाजानं कवी म्हणून स्वीकारलेलं नाही, अशी खंत अभिनेते कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी व्यक्त केली.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात अभिनेते किशोर कदम यांच्याशी राजीव श्रीखंडे यांनी गप्पा मारल्या. याप्रसंगी, कवी म्हणून आपण झालेला प्रवास, सत्यजित दुबे यांच्याकडे घेतलेले अभिनयाचे धडे याचा प्रवास उलगडला.
‘नटरंग’मुळे सेकंड इनिंग सुरू
दिग्गजांकडे अभिनयाचे धडे घेतल्यानंतर मधल्या सात वर्षांसाठी माझ्याकडे काम नव्हते. संगीतकार अजय - अतुल यांच्या स्टुडिओबाहेरून जाताना काम मागण्यासाठी गेलो. त्यांनी ‘वाजले की बारा’ लावणी ऐकवली. दिग्दर्शक रवी जाधव एक सिनेमा करीत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे रवी जाधव यांचा नंबर मागितला. समोरून ‘सिनेमात काम करणार का?’ अशी विचारणा झाली आणि मग ‘नटरंग’ घडला आणि नटरंगच्या निमित्ताने माझी सेकंड इनिंग सुरू झाली, अशी आठवण सौमित्र यांनी सांगितली.