मुंबई: अभिनेते दिग्दर्शक तसेच निर्माते पुष्कर श्रोत्री (५३) यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या जोडप्याने लाखोंचे दागिने लंपास करत त्या जागी हुबेहूब खोटे दागिने आणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुष्कर यांच्या तक्रारी नंतर विलेपार्ले पोलिसांनी मोलकरीण उषा गांगुर्डे (४१) आणि तिचा पती भानुदास (४६) यांच्या विरोधात गुन्हा गुरुवारी दाखल केला असून तपास सुरू आहे.
पुष्कर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरकाम तसेच त्यांचे वडील सुधाकर (८७) यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी केअर टेकर म्हणून उषा हिला सहा महिन्यांपूर्वी कामावर ठेवले होते. रात्री आठ वाजेपर्यंत काम करत असल्याने संपूर्ण घरात तिचा वावर असतो. तसेच अहिल्या आणि अक्षता अशा दोन महिलाही या ठिकाणी दोन शिफ्ट मध्ये काम करतात. पुष्कर यांनी १५ ऑगस्ट रोजी वडिलांना १ लाख २० हजार रुपये दिले होते. ते त्यांनी मोजून कपड्याच्या पिशवीत घालून वापरत्या लाकडी कपाटामध्ये ठेवले. काही कामाने पुष्कर १७ ऑगस्ट रोजी अमेरिकेला गेले आणि २० सप्टेंबर रोजी परतले. तर त्याची पत्नी देखील २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत दुबईत असल्याने वडील घरात एकटेच होते.
अमेरिकेवरून परतल्यानंतर पुष्कर यांनी वडिलांचे कपाट पाहिले तेव्हा त्यामध्ये ठेवलेली रक्कम त्यांना सापडली नाही तसेच त्यांच्या बेडरूम मधले त्यांचे पाकीटही गायब होते ज्यात विविध देशांचे परदेशी चलन ठेवण्यात आले होते. तेव्हा घरात चोरी झाल्याचा विश्वास त्यांना बसला आणि उषावर संशय असल्याने त्यांनी तिची चौकशी केली. याप्रकरणी त्यांनी विलेपार्ले पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त त्यांची पत्नी प्रांजल यांनी कपाटातून दागिने घालण्यासाठी काढले तेव्हा त्यामध्येही काहीतरी फेरफार झाला तर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी ही बाब पुष्कर यांना सांगितली आणि जिथून त्यांनी दागिने विकत घेतले त्यात ज्वेलर्स कडे त्यांनी दागिने तपासले. ते दागिने खोटे असल्याचे सोनाराने त्यांना सांगितले. जवळपास १० लाख २७ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल गांगुर्डे जोडप्याने लंपास केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तेच दागिने तिने चोरले ...
उषा हिने प्रांजलचे तेच दागिने चोरले ज्याचे हुबेहूब बनावट दागिने तिला मिळाले. ज्यात गोफ, बांगड्या , वळे यांचा समावेश आहे. मात्र ज्याचे डुप्लिकेट दागिने तिला मिळू शकले नाही ते मात्र तिने कपाटात तसेच ठेवले जेणेकरून कोणालाही त्यावर संशय येऊ नये. ( पुष्कर श्रोत्री - अभिनेते )
म्हणे साठ हजार मिळाले
पोलिसांनी भानुदास याला ताब्यात घेत त्याची चौकशी केल्यानंतर उषाने चोरलेल्या परदेशी चलनाचे विनिमय करून त्या बदल्यात ६० हजार रुपये रक्कम प्राप्त केल्याचे उघड झाले आहे.