मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या वाहनचालकावर वांद्रे परिसरात शनिवारी रात्री जमावाने हल्ला केल्याची सीसीटीव्ही दृश्यफीत व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रविनाच्या वाहनचालकाने एका महिलेच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप करत काही जणांनी रवीनासह तिच्या चालकाला मारहाण केली, असे या दृश्यफितीत दिसते.
दृश्यफितीत रविना ‘प्लीज, मारो मत’ म्हणत जमावाला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. या प्रकरणाची नोंद खार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मारहाणीची ही घटना वांद्र्याच्या कार्टर रोड भागात शनिवारी रात्री घडली. स्थानिकांनी रवीना व तिच्या वाहनचालकानेच तीन महिलांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची खार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेबाबत रवीनाने अद्याप कोणतीही माहिती वा प्रतिक्रिया दिलेली नाही. तिच्या वाहनचालकाने तिघांना धडक दिली, त्यानंतर जमाव संतप्त झाला आणि त्यातून ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवीना जमावाला समजावण्यासाठी गाडीतून बाहेर पडल्यानंतर तिला जमावाने मारहाण केल्याचे एका पोलिसाने सांगितले.
रवीनाच्या इमारतीबाहेर आपली आई, बहीण आणि भाची फेरफटका मारत असताना ही घटना घडली. रवीनाच्या वाहनचालकाने माझ्या आईच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर, रवीनाने गाडीतून उतरून माझ्या भाचीला आणि अन्य नातेवाइकांना मारहाण केली, असा आरोप दृश्यफितीमध्ये मोहम्मद या व्यक्तीने केला आहे. तसेच ती नशेत असल्याचाही आरोप केला.
आरोप खोटा असल्याचा केला दावा या प्रकरणाशी संबंधित व्हायरल झालेल्या दुसऱ्या एका दृश्यफितीत चालक गाडी व्यवस्थित चालवताना दिसत आहे. मात्र, एक महिला गाडी जवळ येते. त्यानंतर ती अन्य महिलांशी काहीतरी बोलत असताना वादाला तोंड फुटते. त्यामुळे रवीनाच्या चालकाने गाडी अंगावर घातल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचेही स्पष्ट होत आहे.