लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओंकार ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्हामध्ये सक्तवसुली संचालनालयने (ईडी) रविवारी अभिनेता सचिन जोशी याला अटक केली. शनिवारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यात समाधानकारक माहिती न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईच्या ओंकार बिल्डर्सविरोधात २२ हजार कोटींहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुटखा उत्पादक जे. एम. जोशी यांचा मुलगा असलेल्या सचिन जोशी याने ओंकार ग्रुपमध्ये सुमारे १०० कोटींची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
ओंकार बिल्डर्स ग्रुपने झोपडपट्टी पुर्नवसन योजनेत (एसआरए) २२ हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने मागच्या महिन्यात ओंकार ग्रुपचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि कार्यकारी संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे.