ओंकार ग्रुप घोटाळा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुमारे शंभर कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक केलेल्या अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी याला सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) १८ फेब्रुवारीपर्यंत कोठडी मिळाली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
ओंकार बिल्डर्सने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) २२ हजार कोटींचा घोटाळा केला. त्यांच्याकडे सचिन जोशीने १०० कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याचे तपासातून पुढे आले आहे. याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दोन दिवस अनेक तास कसून चौकशी केली. मात्र, त्याच्याकडून तपासात सहकार्य करण्यात येत नव्हते. अखेर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.
सचिन जोशी हा गुटखा उत्पादक जे. एम. जोशी यांचा मुलगा आहे. त्याची हॉटेलिगसह विविध व्यवसायात मोठी गुंतवणूक आहे. हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या याचा बंगला सचिन जोशीने लिलावात विकत घेतला आहे. व्यावसायिक पराग संघवीने ५८ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जोशीविरुद्ध ऑक्टोबर २०२० मध्ये अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
...................