अभिनेता समीर शर्मा आत्महत्या प्रकरण: "कोणाविरोधातही आमची तक्रार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:55 AM2020-08-12T05:55:34+5:302020-08-12T05:55:41+5:30
कुटुंबीयांची पोलिसांना माहिती
मुंबई : अभिनेता व मॉडेल समीर शर्मा (४४) यांच्या आत्महत्येप्रकरणी आमची कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी मालाड पोलिसांना सांगितले.
शर्मा यांची पत्नी वेगळी राहत असल्याने बंगळुरूमध्ये राहणारी त्यांची बहीण व भावोजी यांचा जबाब मालाड पोलिसांनी नोंदविला. जबाबानुसार, शर्मा हे मानसिक आजाराने ग्रस्त होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. घरच्यांनी नुकतेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
शर्मा यांच्या कुटुंबीयांची कोणाविरोधातही तक्रार नसून आतापर्यंतच्या चौकशीत काहीही संशयित आढळलेले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याला बायपोलरसारख्या मानसिक आजाराने ग्रासल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात आल्याचे म्हणत शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती.
त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, या प्रकरणी प्रसारमाध्यमांना कोणतीही खासगी माहिती मिळू नये याची काळजी घ्यावी. शर्मा यांची ‘मीडिया ट्रायल’ आम्हाला नको आहे, अशी विनंती यापूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांनी मालाड पोलिसांना केली आहे.
अधिक तपास सुरू
शर्मा यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी मालाड येथील त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. मृत्यूपूर्वी मोबाइलमधील सर्व इनकमिंग व आऊटगोइंग फोन त्यांनी डिलीट केले होते. या प्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करत आहेत.