मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा 10 वर्षांनी सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं आहे. संजय दत्त 25 तारखेला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांच्याकडून करण्यात आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. या सभेत संजय दत्त यांच्याकडून रासपाला शुभेच्छा देत असल्याचा व्हिडीओ दाखविण्यात आला होता.
संजय दत्त महाराष्ट्राच्या राजकारणात उतरत असून यापूर्वी समाजवादी पक्षाकडून संजय दत्त यांनी निवडणूक लढविली होती. संजय यांची बहिण प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत तसेच त्यांचे वडिल दिवंगत सुनील दत्त हेदेखील काँग्रेसचे खासदार होते.
शिवाजी पार्क येथील मेळाव्यात बोलताना महादेव जानकर म्हणाले की, संजय दत्त दुबईत असल्याकारणाने या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याकडून 25 सप्टेंबरची तारीख देण्यात आली आहे. नाहीतर आजच्या मेळाव्यात संजय दत्त यांनी राष्ट्रीय समाज पार्टीत जाहीर प्रवेश केला असता. पक्षाच्या विस्तारासाठी सिनेमा क्षेत्रात काम करणे सुरू केले आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो हे येणाऱ्या काळात कळेलच.
2009 मध्ये संजय दत्त समाजवादी पक्षाकडून लखनऊ येथील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यापूर्वी अनेकदा संजय दत्त हे बहिण प्रिया दत्त यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचं दिसून आलं होतं. सुनील दत्त हे अनेक काळ काँग्रेसचे खासदार होते. मात्र संजय दत्त यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात समाजवादी पक्षाकडून झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संजय दत्त रासपाच्या माध्यमातून प्रचार करणार का हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान महादेव जानकर यांनी व्यासपीठावरून पंकजा मुंडे यांना संजय दत्त लवकरच रासपात प्रवेश करेल आणि रासपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरेल असं सांगण्यात आले आहे. तसेच पंकजाताई सांगतील त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी संजय दत्त येईल असा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे. मात्र रासपा प्रवेशाबाबत अभिनेता संजय दत्तने अधिकृत दुजोरा दिला नाही.