अभिनेते शेखर नवरे यांचे निधन; कलाक्षेत्रात हळहळ
By Admin | Published: January 13, 2016 02:27 AM2016-01-13T02:27:14+5:302016-01-13T02:27:14+5:30
नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारे अभिनेते शेखर नवरे (५८) यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. मंगळवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर
मुंबई : नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारे अभिनेते शेखर नवरे (५८) यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. मंगळवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मधुमेहाचा आजार होता; त्यामुळे गेले काही दिवस ते रुग्णालयात दाखल होते. त्यांना नाट्यनिर्माते अनंत पणशीकर, अभिनेते उपेंद्र दाते, विजय गोखले, अरुण होर्णेकर, अजित केळकर आदी रंगकर्मींनी श्रद्धांजली अर्पण केली. नवरे हे व्यवसायाने डॉक्टर होते. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला होता. ‘राजा इडिपस’ या नाटकातून त्यांनी अभिनयाच्या प्रांतात पाऊल टाकले. ‘शो मस्ट गो आॅन’ हे तत्त्व शेखर नवरे यांनी अंगीकारले होते. मध्यंतरीचा काही काळ विश्रांती घेऊन त्यांनी रंगभूमीवर पुन्हा पाऊल टाकले होते. त्यानंतर त्यांनी ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक करत रंगभूमीवर पुन्हा एन्ट्री घेतली होती. प्रकृती साथ देत नसतानाही केवळ नाटकाविषयी असलेल्या तळमळीने त्यांनी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग यशस्वीरीत्या सादर केला होता. ‘माझं काय चुकलं’, ‘मार्ग सुखाचा’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘एक होता शहाणा’, ‘आंदोलन’ या नाटकांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या. पुढचं पाऊल, खरा वारसदार, श्यामचे वडील अशा चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. दूरदर्शनवरील त्यांची ‘संस्कार’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. (प्रतिनिधी) ‘नाटकासाठी जीव टाकायचा’ नाटकासाठी शेखर अक्षरश: जीव टाकायचा. आम्ही बरीच वर्षे एकत्र नाटके केली. ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकात शेखर होता. ‘गिधाडे’, ‘आंदोलन’ अशी बरीच नाटके त्याने गाजवली. - अरुण होर्णेकर, अभिनेता ‘उत्तम कलाकार, उत्तम मित्र’ माझ्या ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकात शेखरने टॉम अल्टर, अरुण होर्णेकर आणि दिलीप खांडेकर यांच्या सोबत काम केले होते. या नाटकातल्या त्याच्या भूमिकेचे नाट्यसृष्टीत खूप कौतुक झाले होते. तो उत्तम कलाकार तर होताच; पण उत्तम मित्रसुद्धा होता. ‘नाटकाविषयी त्याला खूप आत्मीयता होती. - अनंत पणशीकर, नाट्यनिर्माते रंगभूमीवरील जाणता मार्गदर्शक हरपला मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते शेखर नवरे यांच्या निधनाने रंगभूमीवरील जाणता मार्गदर्शक हरपला. त्यांनी विविध नाटकांतून आणि सिनेमातून केलेल्या भूमिकातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप उमटवली. प्रेक्षकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवरे यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री