...म्हणून 'त्या' मुलासाठी सोनू सूदनं परदेशातून बोलावले डॉक्टर; उद्या मुंबईत होणार ऑपरेशन
By कुणाल गवाणकर | Published: February 2, 2021 02:16 PM2021-02-02T14:16:23+5:302021-02-02T14:24:08+5:30
९ वर्षांच्या लकीच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला; उपचारांचा खर्च उचलणार
झाशी: कोरोना संकट काळात, लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या मदतीला धावून गेलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अद्यापही गरजूंना मदतीचा हात देत आहे. लॉकडाऊनमध्ये मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये परतण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सोनू सूदचं अनेकांनी कौतुक केलं. आता सोनू झाशीतल्या ९ वर्षांच्या मुलाच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. लकीच्या हृदयाला एक छिद्र आहे. त्याच्या उपचारांची जबाबदारी सोनूनं आपल्या खांद्यावर घेतली आहे.
सोनू सूदला उच्च न्यायालयाचा तगडा झटका; बेकायदा बांधकामावरील आव्हान याचिका फेटाळली
लकीचे वडील मुलाच्या उपचारांसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करत होते. त्यांची व्यथा सोनू सूदपर्यंत पोहोचली. त्यानं लकी आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईत बोलावलं. सोनूच्या मदतीमुळे लकी आणि त्याचं कुटुंब मुंबईत आलं. झाशीतल्या शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या धर्मेंद्र यांचा मुलगा लकीचं हृदय उजव्या बाजूला आहे. लकीच्या जन्मानंतर धर्मेंद्र यांनी एम्ससोबत देशातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये त्याच्या उपचारांसाठी प्रयत्न केले. त्यावेळी डॉक्टरांनी लकीच्या हृदयात छिद्र असल्याचं सांगितलं.
'इथं मोफत कपडे शिवून मिळतील'; सोनू सूद चालवतोय शिलाई मशिन; पाहा व्हायरल व्हिडीओ
धर्मेंद्र मजुरी करून चरितार्थ चालवतात. लकीच्या उपचारांसाठी होणारा खर्च त्यांना परवडणारा नाही. काही दिवसांपूर्वी नया उजाला संस्थेकडून लकीच्या उपचारांसाठी ट्विट करण्यात आलं. त्यानंतर सोनूनं लकीच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. सोनूच्या व्यवस्थापकानं लकीच्या वडिलांशी संवाद साधला. उद्या लकीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी परदेशातून डॉक्टरांना बोलावण्यात आलं आहे. सोनू सूदनं मदतीचा हात दिल्याबद्दल धर्मेंद्र यांनी त्याचे आभार मानले आहेत.
बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात मात्र अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. याआधी सोनूनं भदोही जिल्ह्यातल्या एका २२ वर्षीय तरुणीच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे बोन टीबीचा सामना करणाऱ्या तरुणीला मोठा दिलासा मिळाला.