कंगना राणौत ( Kangana Ranaut ) आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात रंगलेल्या वादानंतर आता सोनू सूद ( Sonu Sood) विरुद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी BMC नं जुहू येथील ६ मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याचा आरोप करताना सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन(MRTP) कायद्याखाली बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याविरोधात सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay HC ) याचिका दाखल केली आहे.
BMCनं ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, सोनू सूदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचं कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनधिकृत बदल करता येत नाहीत असं बीएमसीने सांगितले. सोनू सूदच्या वतीनं वकील डी पी सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा केला आहे.
न्यायाधीश पृथ्वीराज चव्हान यांच्या खंडपीठाकडे सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ''याचिकाकर्ता ( सोनू सूद) यांनी इमारतीच्या आराखड्यात कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्यांतर्गत ज्या बदलांना मान्यता आहेत, तेच करण्यात आले आहेत,''असे सिंग यांनी सांगितले.
सोनू सूदला BMCने ऑक्टोबरमध्ये नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक कोर्टात धाव घेतली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप दिलासा मिळाला नाही. कोर्टाने सोनू सूदला ३ आठवड्यांची मुदत हायकोर्टात जाण्याची दिली होती. ही मुदत संपली त्यानंतर बीएमसीने सोनू सूदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.