मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput Case) यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. आता सीबीआयने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. सीबीआयने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे या सर्वांवर नोंदवण्यात आले आहेत. मात्र याचदरम्यान सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील रोज विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सुशांतचे आत्महत्येपूर्वी रियासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. तसेच दोघांमधील हा वाद इतका विकोपाला गेला होता की, दोघांनी एकमेकांवर हात उचलला होता. त्यामुळे रागारागात रिया सुशांतचे घर सोडून गेली होती. एवढंच नाहीतर रियाने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला होता' अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्या हाती घेतला असतानाच या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सीबीआयसोबतच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) या प्रकरणाचा तपास करतेय. ईडीने गेल्या शुक्रवारी रिया चक्रवर्तीची 8 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान रियाने तिचा दुसरा मोबाईल नंबर लपवल्याचे समोर आले आहे. मोबाईल नंबर लपवल्यामुळे नाराज ईडीने आता रियाचा हिडन डाटा मिळवण्याची तयारी केली आहे. आज पुन्हा ईडी रियाची चौकशी करणार आहे.
ईडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने रियाला तिचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जमा करण्यास सांगितले. यावेळी तिने तिचा एक दुसरा फोन नंबर सांगितला नाही. हा नंबर ती वापरत असूनही तिने त्याबद्दलची माहिती लपवून ठेवली. ईडीला मात्र याची माहिती होती. ईडीने तिच्या दुस-या फोनचे कॉल रेकॉर्ड दाखवले तेव्हा कुठे रियाने दुसरे सिम वापरत असल्याची कबुली दिली.
ईडीला सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार आढळले आहेत. यावर रियाला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले आहे. यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सर्व समोर येणार आहे.