अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींची याचिका फेटाळा, रिया चक्रवर्तीची उच्च न्यायालयाला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 06:21 AM2020-10-28T06:21:04+5:302020-10-28T07:06:56+5:30
Riya Chakraborty News : सुशांतसिंह राजपूतसाठी बनावट औषधांचे प्रिस्क्रिप्शन मिळविल्याबद्दल नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी त्याच्या दोन्ही बहिणींनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती रिया चक्रवर्ती हिने उच्च न्यायालयाला केली.
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतसाठी बनावट औषधांचे प्रिस्क्रिप्शन मिळविल्याबद्दल नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी त्याच्या दोन्ही बहिणींनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने उच्च न्यायालयाला केली. रियाही सुशांत आत्महत्येप्रकरणी आरोपी आहे. सध्या तिची सुटका जामिनावर करण्यात आली आहे.
सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांच्याविरुद्ध रियाने पोलिसांत तक्रार नोंदविली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दोघींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर, या प्रकरणात रियाने प्रतिज्ञापत्र दाखल केले. दोघींच्या याचिकेवर आक्षेप घेत त्यांची याचिका फेटाळावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
पुढील सुनावणी ४ नाेव्हेंबरला
प्रियांका आणि मीतू या दोघांवरील केसचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला वेळ देण्याची आवश्यकता आहे, असे रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सुशांतला औषधे देण्यासाठी दाेघींनी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी असलेली औषधे मिळवली, असा आरोप रियाने सुशांतच्या बहिणींवर केला आहे. त्या औषधांनंतर पाच दिवसांतच सुशांतचा मृत्यू झाला. ही औषधे सुशांतने घेतली हाेती की नव्हती? त्याच औषधांमुळे सुशांतचा मृत्यू झाला की नाही, हे तपास यंत्रणेला तपासावे लागेल, असेही रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी ठेवली.