Join us

सिंधुदुर्गात फिल्मसिटी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 9:52 AM

कोकण चित्रपट महोत्सवात ‘सरला एक कोटी’ची सरशी.

मुंबई :कोकणातील निसर्ग आणि लोकेशन्स अत्यंत सुंदर असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलाकार-तंत्रज्ञांनी इथे येऊन चित्रपट, वेब सिरीज, मालिका, म्युझिक व्हिडीओ शूट करायला हवे. निसर्गरम्य सिंधुदुर्गामध्ये फिल्मसिटी होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. 

कोकणातील कलावंतांची कला जगभर पोहोचवण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंच कायम अग्रेसर राहील आणि मी इथेच म्हातारा होईन, असे अभिनेते विजय पाटकर म्हणाले. ‘कोकण चित्रपट महोत्सव’ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोकण चित्रपट महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, यंदा मालवणमधील मामा वरेरकर नाट्यगृहात प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. 

 मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांच्या परफॉर्मन्सने सजलेल्या या सोहळ्यात ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या, अभिनेता ओमकार भोजनेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि प्रियदर्शनी इंदलकरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरले. 

 ‘सरला एक कोटी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नितीन सुपेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता ओमकार भोजने, सर्वोत्कृष्ट संगीतकार विजय नारायण गवंडे असे चार महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. 

हे विशेष पुरस्कार... 

‘ती फुलराणी’साठी प्रियदर्शनी इंदलकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘तमाशा LIVE’मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्याचा, तर ‘वाळवी’तील व्यक्तिरेखेसाठी नम्रता संभेरावला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे (दगडी चाळ २), पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), विनोदी अभिनेता प्रकाश भागवत (गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात), लक्षवेधी अभिनेता संदीप पाठक (विठ्ठल माझा सोबती), विनोदी चित्रपट ‘घे डबल’, चित्रपट पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ यांना प्रदान करण्यात आले.

विशेष पुरस्कारांमध्ये दिग्गजांची वर्णी :

 विशेष पुरस्कारांमध्ये सचिन चिटणीस, श्रेयस सावंत आणि प्रेरणा जंगम यांना पत्रकारितेसाठी ‘सिंधुरत्न पत्रकार पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. अभिनेत्री अर्चना नेवरेकर पुरस्कार यांना कोकणची शान पुरस्कार देण्यात आला. 

 प्रभाकर मोरे, अभिजित चव्हाण, पंढरीनाथ कांबळी, दिगंबर नाईक, संतोष पवार यांना ‘कोकणरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

 लीना नांदगावकर यांना ‘सिंधुरत्न कोकण कन्या पुरस्कार’ देण्यात आला. 

 दिगंबर नाईकने मालवणी भाषेत, तर संदीप पाठकने मराठवाडी शैलीत पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सिंधुरत्न कलावंत मंचचे सचिव विजय राणे यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :मुंबईकोकणविजय पाटकर