Join us

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ सोहळ्याने भारावले रंगभूमीवरील कलावंत; ही मदत नसून भेट, अशोक सराफ यांनी मांडली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 8:29 AM

यावेळी कलाकार आणि तंत्रज्ञांना ७५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

मुंबई : रंगभूमीसाठी जीवन वेचणाऱ्या वयोवृद्ध कलाकार-तंत्रज्ञांना आपण एक भेट द्यावी म्हणून आम्ही त्यांचा सन्मान केला आहे, ही त्यांना सराफ कुटुंबाने केलेली मदत नसून एक भेट आहे. यामुळे त्यांना काही मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल, अशा भावना ‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या. यावेळी कलाकार आणि तंत्रज्ञांना ७५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या हृद्य सोहळ्यामुळे कलावंत भारावून गेले होते. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सोहळा झाला. यावेळी अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, सुभाष सराफ, डॉ. संजय पैठणकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, शामराव विठ्ठल को-ऑप. बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, अल्कॉन एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष अनिल खवटे उपस्थित होते. अशोक सराफ यांच्या  ‘मी बहुरूपी’ पुस्तकासाठीच्या प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंतांच्या  सन्मानासाठी करण्यात आला. सोहळ्यात उपेंद्र दाते (अभिनेते), सुरेश ऊर्फ बाबा पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार), अर्चना नाईक (अभिनेत्री), वसंत अवसरीकर (अभिनेते), दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री), नंदलाल रेळे (ध्वनी संयोजक), अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते), प्रकाश बुद्धीसागर (दिग्दर्शक), पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका), वसंत इंगळे (अभिनेते), सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते), किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक), शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत), हरीश करदेकर (नाट्य कलावंत), सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक), विष्णू जाधव (नेपथ्य सहायक), एकनाथ तळगावकर (नेपथ्य सहायक), रवींद्र नाटळकर (नेपथ्य सहायक), विद्या पटवर्धन (अभिनेत्री), उल्हास सुर्वे (नेपथ्य सहायक) यांना सन्मानित केले. निवेदिता म्हणाल्या, ‘मी बहुरुपी’ हे अशोकचे आत्मचरित्र नसून यानिमित्त रंगभूमीवरील नाट्य इतिहास समोर यावा, ही भावना होती. 

ही संकल्पना मुळात निवेदिताची असून, माझा धाकटा भाऊ सुभाषने याला मूर्त स्वरूप दिले. ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाचा खर्च झाल्यावर त्यातून जे उरेल ते कलाकार-तंत्रज्ञांना वाटू या, असे निवेदिता म्हणाली आणि ते ऐकून मी पहिल्यांदा दचकलो. कारण ही सोपी गोष्ट नव्हती. अशा लोकांची संख्या खूप मोठी असल्याने यासाठी एक व्यक्ती पुरी पडू शकणार नाही. हे निश्चित माहीत आहे, तरीही आम्ही हे करायचे ठरवले आणि त्यात आज यशस्वी झालो. - अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

टॅग्स :अशोक सराफ