मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सहकलाकार राहिलेल्या ६७ वर्षीय अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांनी मंगळवारी सिद्धिविनायक मंदिराबाहेर निधी जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे. औषधाेपचार आणि खाण्यापिण्याचा खर्च सुटावा यासाठी जीवनाच्या उत्तरायणात मदतीकरिता राज्य शासनाचे उंबरठे झिजवण्यापेक्षा स्वतः देवाच्या दारी जाऊन पैसे जमा करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धिविनायक मंदिराबाहेर देणगी जमा करण्यासाठी ऐश्वर्या राणे यांनी सुरुवात केली. याविषयी त्यांनी सांगितले, भविष्यात मुंबादेवी, महालक्ष्मी, बाबुलनाथ आणि शिर्डी अशा विविध मंदिरांबाहेर जाऊन निधी जमा करणार आहे. सर्वांकडून केवळ पाच रुपयांच्या मदतीची अपेक्षा आहे. नवी मुंबई येथील भाजपच्या लोकप्रतिनिधी लीना गराड यांनी राहण्याची सोय केली आहे, मात्र तरीही खाण्याचा आणि औषधोपचाराच्या खर्चाकरिता मदतीची आवश्यकता आहे. राज्य शासनाकडे वारंवार मदतीसाठी जाण्याची इच्छा नाही. माझी अवस्था पाहून यंत्रणांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘धुमधडाका’ या गाजलेल्या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या राणे या कोणाला ओळखूही येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाेबत ‘भटक भवानी’ या चित्रपटातही मुख्य नायिका म्हणून काम केले आहे. त्यांचे ‘प्रियतम्मा’ हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते.केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. ‘मर्द’ सिनेमात अमृता सिंगच्या बॉडीडबलचे काम करताना त्यांना घोड्याने फेकले. त्यावेळी त्यांना जास्त त्रास झाला नाही, पण सहा महिन्यांनंतर त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यावेळी त्या दुबईत होत्या. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना इतकी महाग ट्रीटमेंट दिली की त्यांना ती झेपली नाही. त्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी घर, दागिने, एफडीही मोडल्या. घरी काहीही न सांगता त्या दुबईला जाऊन उपचार घेत असत. काही दिवसांत त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या, यामुळे साहजिकच त्या अभिनयापासून दूर गेल्या. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले काममहानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या यांनी ग्रुप डान्स ते असिस्टंटपर्यंत काम केले आहे. ऐश्वर्या या अमिताभ यांच्या लाडक्या होत्या, असे त्यांनी सांगितले. अमिताभ त्यांना घरातील सदस्याप्रमाणे सेटवर वागवत असत, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या चीफ असिस्टंट म्हणूनही काम केले. ‘मर्द’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झाल्या अपघातग्रस्त‘मर्द’ या चित्रपटात अमृता सिंग यांच्या बॉडीडबल बनलेल्या असताना ऐश्वर्या घोड्यावरून पडल्या. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांच्या शरीराचा खालचा भाग लुळा पडला. नातेवाईकही दुरावले ऐश्वर्या यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना काम मिळेनासे झाले आणि त्यामुळे पैशांची अडचण येऊ लागली. यामुळे सगळे भाऊ-बहीण दुरावल्याचे त्या सांगतात. कुटुंब दुर्लक्ष करत आहे हे पाहून ऐश्वर्या यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि त्यानिमित्त त्या देशभरात फिरत असतात.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केलेल्या अभिनेत्रीची बिकट अवस्था; मदतीसाठी पोहोचल्या देवाच्या दारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 3:51 AM