अभिनेत्री आमिषा पटेलचे हॅक अकाउंट २४ तासांत रिकव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:04+5:302021-01-08T04:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सायबर हल्ल्यामध्ये आता इन्स्टाग्राम अकाउंट हॅकर्सची भर पडली आहे. खोटा मेसेज पाठवून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायबर हल्ल्यामध्ये आता इन्स्टाग्राम अकाउंट हॅकर्सची भर पडली आहे. खोटा मेसेज पाठवून लिंकद्वारे अकाउंट हॅक करून त्याची सर्व माहिती मिळवली जात आहे. अभिनेत्री आमिषा पटेल हिचे इन्स्टाग्राम अकाउंट अशाच पद्धतीने हॅक करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत त्याचा छडा लावत ते ‘रिकव्हर’ करण्यात यश मिळवले. नेदरलँडमधील एकाने तुर्कीतील आयपी अड्रेस वापरून अमिषाचे अकाउंट हॅक केले होते. त्यामुळे अशा ठकसेनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
आमिषाला इन्स्ट्राग्राम अकाउंटवर तुम्ही नियम मोडल्याबद्दल तुमचे खाते २४ तासांसाठी निलंबित करण्यात आले आहे, असा मेसेज पाठवून ‘कॉपी राईट ऑब्जेकॅशन फॉर्म’ ही लिंक पाठविण्यात आली होती. तिने त्यावर क्लिक केल्यानंतर तिचे इन्स्ट्राग्राम अकाउंट हॅक होऊन त्यावरील सर्व फोटो डिलीट झाले. तिने तातडीने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. उपमहानिरीक्षक हरिष बैजल यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार संतोष बोडके यांनी शिताफीने त्याचा छडा लावला असता तुर्कीच्या आयपी अड्रेसवरून तिचे अकाउंट हॅक केल्याचे स्पष्ट झाले. ते पूर्ववत करण्यात आले. शिताफीने केलेल्या तपासाबद्दल पथकाला १० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.