Asawari Joshi: राष्ट्रवादीत प्रवेश करताच आसावरी जोशींचा महागाईवरून मोदी सरकारला खोचक टोला; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:03 PM2022-04-07T16:03:27+5:302022-04-07T16:04:36+5:30
Asawari Joshi: राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन, अशी ग्वाही आसावरी जोशी यांनी दिली.
मुंबई: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला वेगवान घडामोडी घडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आसावरी जोशी यांच्यासह स्वागता शाह यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले.
आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यामागील त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांना धन्यवादही दिले. मात्र, यावेळी आसावरी जोशी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला खोचक टोला लगावल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन
माझी नियुक्ती राष्ट्रप्रदेश उपाध्यक्ष चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह पक्षातील इतर सर्वांचे आभार मानते. मी सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देते. तुम्हा सर्वांना हे वर्ष आनंदाचे, सुख समाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी आणि जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळण्याचे जाऊ दे, अशी अपेक्षा व्यक्त करते, असे आसावरी जोशी म्हणाल्या. तसेच मी राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन, अशी ग्वाही आसावरी जोशी यांनी दिली.
दरम्यान, मी कलाकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय कलाकारांसाठी झटणारा पक्ष माझ्या नजरेत दुसरा कोणताही नाही. म्हाडाच्या सोडतीत कलाकारांसाठी कोटा, मराठी चित्रपटाला उद्योजकाचा दर्जा देण्याची गोष्ट किंवा लोककलावंत इतर कलावंत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ देण्यासंदर्भातील सर्व कलाकारांचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातात. या समस्यांवर उत्तर शोधली जातात आणि यासाठी झटणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे म्हणूनच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असे आसावरी जोशी यांनी स्पष्ट केले.