अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे वृद्धापकाळाने निधन; बहारदार अभिनयाचे युग काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:56 AM2023-01-12T05:56:25+5:302023-01-12T05:56:33+5:30
लग्नापूर्वी असलेल्या कुसुम सुखटणकर यांचा दिवंगत निर्माते, दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह झाला होता.
मुंबई : आपल्या बहारदार अभिनयाने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री चित्रा (वय ८७) यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. चित्रा यांचे मूळ नाव कुसुम नवाथे असे आहे. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. योगायोग म्हणजे मागच्या वर्षी आजच्याच तारखेला त्यांच्या भगिनी रेखा कामत यांचे निधन झाले होते. रेखा आणि चित्रा या दोघी सख्ख्या बहिणींच्या बऱ्याच मराठी चित्रपटांमधील भूमिका गाजल्या आहेत.
लग्नापूर्वी असलेल्या कुसुम सुखटणकर यांचा दिवंगत निर्माते, दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह झाला होता. चित्रा यांनी मालिका, चित्रपट, नाटक आणि जाहिरातींमध्येही काम केले. १९५२ मध्ये रिलीज झालेल्या राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाद्वारे त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. चित्रा यांनी वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी, बोक्या सातबंडे, अगडबम, आदी मराठी चित्रपटांमध्ये नायिका साकारल्या आहेत. कवी ग. दि. माडगूळकर यांनी चित्रपटसृष्टीत कुसुम नवाथे यांना चित्रा असे नाव दिले होते.