लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोराईतील घर ३५ लाखांत विकायचे असल्याचे सांगत अभिनेत्री हेमलता बाणे यांच्याकडून १० लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, त्यानंतर ते या घराचे मालक नसून भाडेकरू आहेत, हे उघड झाले. त्यानुसार बाणे यांनी याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मालाडमध्ये राहणाऱ्या बाणे यांना २०१९ मध्ये त्यांचा व्यायामशाळेतील मित्र भूषण पाटील याने त्याची मालकीण खुशबू गोहिल ही तिचा फ्लॅट विकण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यानी गोहिल आणि तिच्या वडिलांना संपर्क करत ३५ लाख रुपयांना त्यांचे घर खरेदी करण्याची तयारी दाखविली. तसेच त्यासाठी १० लाख रुपये टोकन दिले. मात्र, बरेच महिने होऊनसुद्धा बापलेक घराची कागदपत्रे तयार करण्यास इच्छुक नव्हते. त्याबाबत विचारणा केल्यावर तिला टाळू लागले. त्यानुसार बाणे यांनी चौकशी केली तेव्हा गोहिल हे त्या घरातील भाडेकरू असल्याचे त्यांना समजले. त्यावरून खुशबू व बाणे यांच्यात वाद झाला. खुशबूने त्यांना शिवीगाळ करत १० लाखांचा पोस्ट डेटेड चेक दिला जो बाऊन्स झाला. तेव्हा याप्रकरणी बाणे यांनी पोलिसात तक्रार दिली. जी मागे घेण्यासाठी २२ जुलै २०२१ रोजी मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात तिला एका स्कूटर चालकाने धमकावले. ज्याची तक्रार त्यांनी केल्यावर गोहिल बापलेकीवर ५ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना त्वरित अटक करण्याची मागणी बाणे यांनी केली आहे.