मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत उद्या मुंबईत दाखल होत असून तिला घेरण्याची पुरेपूर तयारी शिवसेनेने केली आहे. कंगनाने तिच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयात नियमबाह्य काम केल्याप्रकरणी महापालिकेने मंगळवारी तिला नोटीस बजावली. तर तिचे ड्रग्ज कनेक्शन तपासण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगनाने सातत्याने मुंबई पोलीस आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. शिवाय, आव्हानात्मक भाषाही केली आहे. तिची टीका जिव्हारी लागल्याने शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कंगनाच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तिच्यावर विधान परिषदेत निषेधाचा ठराव आणि हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर नोटीस बजावली आहे.
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने या ठिकाणी मनिकर्णिका फिल्म नावाने कार्यालय थाटले. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत त्यांना कंगनाच्या कार्यालयात १४ नियमबाह्य कामे दिसून आली आहेत. त्यानुसार पालिकेने तिला या कार्यालयाच्या बांधकामासंबंधी कागदपत्रे उद्यापर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कंगनाचे ड्रग्ज कनेक्शन तपासणार
अभिनेत्री कंगना रनौत स्वत: ड्रग्ज घेत होती आणि इतरांनाही त्यासाठी बळजबरी करत होती, अशी माहिती अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत दिली होती. त्या मुलाखतीची कॉपी शिवसेना नेते सुनिल प्रभू आणि प्रातप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे दिली असून या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.