अभिनेत्री कृतिका चौधरी हत्येप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: July 10, 2017 03:53 PM2017-07-10T15:53:59+5:302017-07-10T16:18:27+5:30
अभिनेत्री आणि मॉडेल कृतिका चौधरी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - अभिनेत्री आणि मॉडेल कृतिका चौधरी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना सोमवारी अटक केली आहे.
गेल्या महिन्यात 12 जूनला 29 वर्षाची मॉडेल कृतिका चौधरी ही अंधेरीतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. 2 ते 3 दिवसांपूर्वी डोक्यावर गंभीर वार करुन तिला मारण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते.
एका वरिष्ठ अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कृतिका चौधरी हत्याप्रकरणी आम्ही दोघांना अटक केली आहे. त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येईल. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा केला असून ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली, याचा मात्र अद्याप खुलासा केला नाही.
दरम्यान, पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेल येथून अटक केली. दोघेही आधीपासूनच कृतिकाला ओळखत होते. कृतिकाची हत्या झाली त्या रात्री दोघे तिच्या घरीच होते. पैशाच्या देवाण घेवाण करण्यासाठी ते कृतिकाच्या घरी गेल्याचे दोघांनी कबूल केले आहे. कृतिकासोबत दोघांची बाचाबाची झाली. दोघांपैकी एकाने फायटरने कृतिकाची निर्घृण हत्या केली.
या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर आले की, डोक्यात गंभीर जखम झाल्यामुळे कृतिका चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान 302 च्या कलमानुसार हत्येच्या गुन्हाची नोंद केली. तसेच, तिला ड्रग्जचे व्यसन होते, त्यामुळे तिची अमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून हत्या करण्यात आली का, या दृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे समोर आले होते. याचबरोबर, कृतिका चौधरीच्या शेजारी राहाणार्या लोकांनी सांगितले होते की, तिला भेटण्यासाठी नेहमी वेगवेगळे लोक येत होते. मात्र, तिच्यावर संशय येईल असे तिचे वर्तन कधीच दिसले नाही.
कृतिका चौधरी हिने अभिनेत्री कंगना राणावत सोबत रज्जो या सिनेमामध्ये काम केले होते. तसेच, क्राइम सीरियल ‘सावधान इंडिया’सह बालाजी प्रॉडक्शनच्या अनेक टीव्ही सीरियल्समध्ये ती झळकली होती. याचबरोबर तिने तेलुगु भाषेतील एक सिनेमा नुकसात साइन केला होता.