अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण : दोषींना आज होणार शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:18 AM2018-05-11T05:18:32+5:302018-05-11T05:18:32+5:30
अभिनेत्री मीनाक्षी थापाच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली असून, सत्र न्यायालय दोषींना आज शिक्षा सुनावणार आहे. हा गुन्हा ‘रेअरेस्ट आॅफ रेअर’ असल्याने दोषींना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयास केली.
मुंबई - अभिनेत्री मीनाक्षी थापाच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली असून, सत्र न्यायालय दोषींना आज शिक्षा सुनावणार आहे. हा गुन्हा ‘रेअरेस्ट आॅफ रेअर’ असल्याने दोषींना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयास केली.
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याकडे काम करीत असलेले ज्युनिअर आर्टिस्ट अमित जयस्वाल व त्याची गर्लफ्रेंड प्रीती सरिन यांना बुधवारी सत्र न्यायालयाने मीनाक्षी थापाची हत्या, अपहरण व तिच्या कुटुंबीयांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवले.
मीनाक्षी थापा ही नेपाळी अभिनेत्री होती. तिने हिंदी सिनेमांत छोटे-मोठे काम केले आहे. तिला आणखी काही सिनेमांत काम देतो, असे सांगून अमित व प्रीतीने तिची फसवणूक केली. तिला मुंबईहून गोरखपूरला आणल्यावर मीनाक्षीच्या कुटुंबाकडून १५ लाखांची खंडणी मागितली. मात्र, तिचे कुटुंबीय केवळ ६० हजार रुपये देऊ शकले.
मीनाक्षीने या दोघांना आपण फार श्रीमंत असून केवळ आवडीसाठी चित्रपट करीत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट त्यांनी रचला. परंतु, १५ लाखांऐवजी ६० हजार मिळत असल्याने त्यांनी तिची हत्या केली. ओळख पटू नये यासाठी धड, डोके वेगळे करून त्याची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी लावली. पोलीस तपासात अमित व प्रीतीचा यात हात असल्याचे उघड झाले. दोघांनाही अटक झाली. २०१२ मध्ये अमित व प्रीतीने पैशांसाठी मीनाक्षीची हत्या केली. तिने मधुर भंडारकरच्या ‘हीरोइन’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या सेटवरच मीनाक्षीची अमित व प्रीतीशी ओळख झाली.