अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 06:13 AM2018-05-12T06:13:01+5:302018-05-12T06:13:01+5:30

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने अमित जयस्वाल व प्रीती सरिन यांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Actress Meenakshi Thapa was given life imprisonment in the murder case | अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप

Next

मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने अमित जयस्वाल व प्रीती सरिन यांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बुधवारी सत्र न्यायालयाचे न्या. एस. जी. शेट्टे यांनी अमित व प्रीतीला भारतीय दंड संहिता ३०२ (हत्या) व ३६४ (खंडणीसाठी अपहरण करणे) या दोन कलमांतर्गत दोषी ठरविले होते.
या दोघांनी केलेला गुन्हा ‘रेअरेस्ट आॅफ रेअर’मध्ये मोडत असल्याने त्यांना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. न्यायालयाने या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ‘हीरोइन’ या चित्रपटात मीनाक्षीने छोटी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या सेटवरच मीनाक्षीची ज्युनिअर आर्टिस्ट अमित जयस्वाल व प्रीती सरिन यांच्याशी ओळख झाली.

मीनाक्षीने या दोघांना आपण फार श्रीमंत असून, केवळ आपल्या आवडीसाठी चित्रपट करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या दोघांनी तिचे अपहरण करून तिच्या घरच्यांकडून खंडणी उकळण्याचा कट रचला, परंतु १५ लाख रुपयांऐवजी केवळ ६० हजार मिळत असल्याने अमित व प्रीतीने तिची २०१२मध्ये हत्या केली. तिची ओळख पटू नये, यासाठी मीनाक्षीचे धड आणि डोके वेगळे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली.
पोलिसांनी तपास केल्यानंतर, यामध्ये अमित व प्रीतीचा हात असल्याचे उघडकीस आले. हे दोघेही मीनाक्षीचे डेबिट कार्ड वापरून तिच्या खात्यातील पैसे काढत होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अमित व प्रीतीला अटक केली होती.

केवळ ६० हजार रुपयेच मिळाले
मीनाक्षी थापा ही नेपाळी अभिनेत्री होती. तिने हिंदी सिनेमात छोटे-मोठे काम केले आहे. तिला आणखी काही सिनेमांत काम देतो, असे सांगून अमित व प्रीतीने तिची फसवणूक केली. तिला मुंबईहून गोरखपूरला आणण्यात आले. त्यानंतर, मीनाक्षीच्या कुटुंबीयांकडून १५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. मात्र, तिचे कुटुंबीय केवळ ६० हजार रुपये देऊ शकले.

Web Title: Actress Meenakshi Thapa was given life imprisonment in the murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.