मुंबई - दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खूप दिवसांपासून मी अजितदादांची वेळ मागितली होती. मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर होती तेव्हा मी लगेच हो म्हणाले, यासाठी २ कारणे आहेत असं सांगत गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
गार्गी फुले म्हणाल्या की, राष्ट्रवादीची विचारसरणी आणि तत्वे ही माझी स्वत:ची आणि बाबांची होती. या तत्वाला न्याय कोण देत असेल तर राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीसोबत काम करण्यास मला आनंद आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहे. राजकारणात तरुणपिढी येत नाही असं बोलतात. पण प्रवाहात काम करायचे असेल तर उतरून काम करावे लागेल असं त्यांनी सांगितले.
तसेच मी किती सक्षम आहे हे पक्ष ठरवेल. माझ्यावर कुठलीही जबाबदारी दिली तरी मी योग्यरित्या पाळेन. राजकारणात तरुणांनी यायला हवे. देशाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर राजकारणात येऊन काम करायला हवं असं गार्गी फुले यांनी म्हटलं तसेच जर पक्षाने तिकीट देऊन निवडणूक लढवण्यास सांगितले तर काय कराल या प्रश्नावर गार्गी फुले यांनी बेधडकपणे नक्कीच मी निवडणूक लढवेन असं उत्तर दिले आहे.