मुंबई - दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोषने केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात पायलने रिपाइंचा झेंडा हाती घेतला असून पक्षाचं संघटना वाढविण्यासाठी काम करणार असल्याचं म्हटलंय. रामदास आठवले यांनी पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी पायल यांची नेमणूक केली आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करत अभिनेत्री पायल घोषने तक्रार दाखल केली होती. त्याच पार्श्वभूमीर पायलने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिच्यासोबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. पायल घोषने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची मागणीदेखील यावेळी आठवलेंनी केली होती. रामदास आठवले म्हणाले की, पोलीस तक्रारीनंतर देखील अनुराग कश्यपची अद्याप चौकशी झाली नसून, त्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात आले. याआधी काल रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्येत पायल घोषच्या पाठिशी रिपब्लिकन पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, पायल घोषणे आज रिपल्बिकन पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात त्याचार केल्याचे आरोप केले असून, ओशिवरा पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
इरफान पठाणचेही घेतले होते नाव
आता या प्रकरणात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचे नाव घेतले आहे. अनुरागने केलेल्या गैरकृत्याबद्दल इरफान पठाणला मी सांगितले होते. पण, आता तो या प्रकरणावर चकार शब्द बोलायला तयार नाही, असा दावा पायलने केला आहे. 2014 मध्ये अनुरागने घरी बोलवून गैरवर्तन केल्याचा पायलचा आरोप आहे. याप्रकरणी अनुरागविरोधात तिने एफआयआर दाखल केला आहे. पायलने एक ट्वीट करत याप्रकरणात इरफान पठाणच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘इरफान पठाणला टॅग करण्याचा अर्थ हा नाही की, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी त्याच्यासोबत रेपसोडून बाकी सर्व काही शेअर केले होते. या सगळ्या गोष्टी ज्या मी त्याला सांगितल्या, त्या तो सांगेल, असा मला विश्वास आहे,’ असे एका ट्वीटमध्ये तिने लिहिले होते.