Rashmika Mandanna ( Marathi News ) : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं मुंबईतील अटल सेतूवरून प्रवास करत पायाभूत सुविधांचा देशात वेगाने विकास होत असल्याचं सांगत केंद्र सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. "दोन तासांचा प्रवास २० मिनिटांत होत आहे. असं काही होईल याचा कोणी विचारही केला नव्हता आणि कोणालाही हे शक्य वाटत नव्हतं. नवी मुंबईपासून मुंबईपर्यंत, गोव्यापासून मुंबईपर्यंत आणि बंगळुरूपासून मुंबईपर्यंतचा प्रवास इतक्या सहजपणे होत आहे. या पायाभूत सुविधा पाहून मला अभिमान वाटतो," अशा शब्दांत रश्मिकाने 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सरकारचं कौतुक केलं आहे.
पुढे बोलताना रश्मिका मंदानानं म्हटलं की, "भारताने आता नकार ऐकणं सोडून दिलं आहे. अमुक एक गोष्ट शक्य नाही, असं भारतात आता म्हटलं जात नाही. मागील १० वर्षांत भारताने खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे. नवा भारत अत्यंत वेगाने पुढे जात आहे आणि आपल्या देशातील तरुण वर्ग सर्वाधिक हुशार आहे, असं माझं मत आहे. हा तरुण दुसऱ्या कोणत्याही प्रभावाखाली न येता पुढे जातोय."
दरम्यान, देशात सुरू असलेला हा विकास थांबू नये, यासाठी प्रत्येकाने मतदान करावं, असं आवाहनही रश्मिका मंदानानं म्हटलं आहे.
अटल सेतूची वैशिष्ट्ये
अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून यापैकी 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असून पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होत आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होत असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.
सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध 10 देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500 हून अधिक अभियंते, तर सुमारे 16500 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर 100 किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे 70 हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.