"व्हिडिओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली, अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:52 AM2021-07-20T11:52:36+5:302021-07-20T11:54:34+5:30
राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही याबाबत वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे.
मुंबई: पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj kundra arrest) यांना सोमवारी रात्री अटक केली. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळाल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असेही गुन्हे शाखेनं सांगितलं आहे.
राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही याबाबत वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता, असं दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे.
सागरिका सोना सुमन म्हणाली की, ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे. तसेच या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.
दरम्यान, पोर्नोग्राफी आणि पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी आपल्या देशात कायदे खूप कडक आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात आयटी अॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.
वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण https://t.co/FNC6z83lbI#शिल्पा_शेट्टी
— Lokmat (@MiLOKMAT) July 20, 2021
इंटरनेटच्या वापराबरोबर अश्लिलतेचा व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याचा समावेश होतो. अशा प्रकारचा कंटेट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करण्यावर किंवा कुणाला पाठवल्यास त्याच्यावर अँटी पोर्नोग्राफी लॉ लागू होतो.
दुसऱ्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवणारे, अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणारे लोक या कायद्यांतर्गत येतात. या कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६७(ए), आयपीसीचे कलम २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद आहे. गुन्ह्याच्या गांभीर्याच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ही शिक्षा ७ वर्षांपर्यंत वाढू शकते.