लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची ऑनलाइन मद्याची खरेदी करताना फसवणूक झाली. याप्रकरणी त्यांनी अद्याप तक्रार केली नसून, गुरुवारी ट्विट करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
आझमी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑनलाइन मद्य खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले. त्यांना होम डिलिव्हरी मिळणार हाेती. मात्र, ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांना ज्या दुकानातून फोन आला होता त्या दूरध्वनी क्रमांकावर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो क्रमांक बंद होता. ‘मी ऑनलाइन पेमेंट फसवणुकीची बळी ठरली असून, इतरांनी याबाबत काळजी घ्यावी आणि अशा भामटेगिरीला फसू नये’, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे. साेबतच पैसे दिल्याचा स्क्रीन शॉटही पोस्ट केला आहे.
याबाबत जुहू पोलिसांना विचारले असता, आमच्याकडे अद्याप तक्रार करण्यात आलेली नसून, ती आल्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी ‘लोकमत’ला दिली.
........................................