Join us

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पतीच पॉर्नोग्राफीचा सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:10 AM

पुरवणी दोषारोपपत्रात ठपका, पॉर्न फिल्ममधून कमवायचा लाखो रुपयेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पतीच पॉर्नोग्राफीचा सूत्रधारपुरवणी दोषारोपपत्रात ठपका, पॉर्न फिल्ममधून ...

पुरवणी दोषारोपपत्रात ठपका, पॉर्न फिल्ममधून कमवायचा लाखो रुपये

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पतीच पॉर्नोग्राफीचा सूत्रधार

पुरवणी दोषारोपपत्रात ठपका, पॉर्न फिल्ममधून कमवायचा लाखो रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासह त्याच्या साथीदारांविरोधात १ हजार ४६४ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात कुंद्रालाच मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. अन्य अटक आरोपीशी संगनमत करत, कुंद्रा हा नवोदित कलाकारांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना या पॉर्नोग्राफीच्या विश्वात अडकवत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यात सुरुवातीला १ एप्रिल रोजी ९ जणांविरुद्ध

३ हजार ५२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. पुढे यात, कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक राज बाहेर आले.

मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न फिल्म रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असताना हॉटशॉट ॲपचा कुंद्राच सूत्रधार असल्याचे आढळून आले. त्यानुसार कुंद्रासह साथीदार रायन थोर्पला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. कुंद्रा आणि रायनने अटक केलेल्या आरोपींशी संगनमत करून सिनेक्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या नवोदित तरुणींच्या आर्थिक परिस्थिती गैरफायदा घेऊन त्यांचे अश्लील चित्रीकरण केले. तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ हे वेबसाईट तसेच मोबाइल ॲप्लिकेशनवर अपलोड केले.

पॉर्न फ़िल्मच्या विक्रीतून गैरमार्गाने लाखो रुपयांची कमाई केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यातील काही महिलांना मोबदला देण्यात आला तर काहींची मोबदलाही न देता फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे. गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण पुरावे त्याने व्हाॅट्सॲप चॅट, मेल मोबाइल, लॅपटॉपमधून नष्ट केले आहे. त्यानुसार, कुंद्रा, रायन सह सिंगापूर येथे राहणारा फरारी आरोपी यश ठाकूर उर्फ अरविंद कुमार श्रीवास्तव, लंडन येथील रहिवासी कुंद्रा याचा भाऊजी प्रदीप बक्षी यांच्याविरोधात किल्ला कोर्टात १ हजार ४६४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. वरील सर्व माहितीचा उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून १३ जणांविरुद्ध ४ हजार ९९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मालमत्ता कक्षाकडून अधिक तपास सुरू आहे.