Join us

अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये गौतम नवलखांसाठी हमीदार, एल्गार परिषद प्रकरणी काेर्टाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:01 PM

Suhasini Mulye : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांचा नजरकैदेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी नवलखा यांच्यासाठी हमीदार म्हणून उभी राहण्याची तयारी दर्शविली. 

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांचा नजरकैदेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी नवलखा यांच्यासाठी हमीदार म्हणून उभी राहण्याची तयारी दर्शविली. अनेक व्याधींनी त्रस्त असलेले ७० वर्षीय नवलखा हे २०२० पासून तळोजा कारागृहात आहेत. नवलखा यांनी नजरकैदेत ठेवण्यासाठी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांना एका महिन्यासाठी नजरकैदेत राहण्याची परवानगी दिली. तसेच या आदेशाची ४८ तासांत अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले. मात्र, अद्यापही नवलखा कारागृहातच आहेत. नजर कैदेची कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ‘भुवन शोमे’, ‘हु तू तू’ सारख्या चित्रपटांत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी विशेष एनआयए न्यायालयात हजर राहत आपण गौतम नवलखा यांच्या हमीदार म्हणून राहत असल्याचे न्यायालयाला सांगितले. नवलखा यांना ३० वर्षे सुहासिनी ओळखत आहेत. त्या दिल्लीला असताना त्यांची ओळख नवलखा यांच्याशी झाली. ‘मी याआधी कोणासाठीही हमीदार म्हणून उभी राहिली नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मी न्यायालयात हजर राहिले आहे,’ असे सुहासिनी यांनी कोर्टाला सांगितले. 

टॅग्स :एल्गार मोर्चामुंबई