अनेक राज्यांत प्रत्यक्ष वर्ग सुरू, महाराष्ट्रातील शाळा कधी भरणार?; पालकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:24 AM2021-09-02T08:24:22+5:302021-09-02T08:24:42+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे.
नवी दिल्ली/ मुंबई : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने योग्य ती खबरदारी घेत उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसह अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा कधी सुरू होणार, असा सवाल पालकवर्गामधून विचारला जात आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत अद्याप तरी शाळा सुरू होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
शाळा बंद असल्याने मुले घरीच कोंडून राहत असून, टीव्ही आणि मोबाइल एवढेच त्यांचे भावविश्व बनून राहिल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. शाळेत गेल्याने मुलांना मोकळ्या हवेत श्वास घेता येईल, या अपेक्षेने इतर राज्यांनी शाळा सुरू केल्या; तर राज्य सरकारला अडचण काय आहे, असा सवाल पालक विचारत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी देशात शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षित वातावरण असावे यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे, असे प्रधान यांनी सांगितले.
अद्याप निर्णय नाही : गायकवाड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. यासंदर्भात टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मागच्या आठवड्यात शिक्षण विभाग आणि राज्य टास्क फोर्सची एकत्रित बैठक झाली. शिक्षण विभागाने आपल्याकडील आदर्श कार्यप्रणाली टास्क फोर्सला दिली आहे, तर टास्क फोर्सनेही त्यांची मानक कार्यप्रणाली आम्हाला दिली आहे. शिक्षण विभागाकडून मानक कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. टास्क फोर्सकडून सूचना आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि त्यानंतर शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.
या राज्यांत वाजली शाळेची घंटा
उत्तर प्रदेश पहिली ते ५वी १ सप्टेंबर
गुजरात ६वी ते ८वी २ सप्टेंबर
तामिळनाडू ९वी ते १२वी १ सप्टेंबर
राजस्थान ९वी ते १२वी १ सप्टेंबर
आसाम १०वी ते १२वी १ सप्टेंबर
हरयाणा ४थी ते ५वी १ सप्टेंबर
छत्तीसगढ ८वी ते ११वी २ सप्टेंबर
कर्नाटक ९वी ते १२वी २३ ऑगस्ट
ओडिशा ९वी ते १२वी १६ ऑगस्ट
हिमाचल प्रदेश १०वी ते १२वी २ ऑगस्ट
उत्तराखंड ९वी ते १२वी २ ऑगस्ट
झारखंड ९वी ते १२वी २ ऑगस्ट
बिहार पहिली ते ५वी १६ ऑगस्ट