शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष वंशज आज भाजपात आले- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 11:41 AM2019-07-31T11:41:10+5:302019-07-31T11:42:31+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचं आज स्वागत केलं.
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचं आज स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्या नेत्यांवर स्तुतिसुमनही उधळली आहेत. मधुकर पिचड यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदर व्यक्त होतो, असे पिचड साहेब आहेत. मधुकर पिचड यांचा हा भाजपा प्रवेश अत्यंत महत्त्वाची घटना आहे.
शिवेंद्र राजेंच्या भाजपा प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते म्हणाले, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपामध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्र राजे भाजपामध्ये दाखल झाले आहेत. मोदींनी राजगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला होता, त्यानंतर ते पंतप्रधान झाले आहेत, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्तानं करून दिली आहे.
कालिदास कोळंबकरांनी माझ्या पाठीमागे राहून सामान्य माणूस आणि पोलिसांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. कालिदास कोळंबकरांच्या नेतृत्वात मिल कामगार आणि पोलिसांना हक्काची घरं मिळतील. कालिदास कोळंबकर भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची बाब आमच्यासाठी आनंदाची आहे. नवी मुंबईतले संदीप नाईक हे अत्यंत संयमी नेते आहेत. संदीप नाईक आल्यानं नवी मुंबईत नक्की होणार काय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण गणेश नाईकही लवकरच भाजपामध्ये येतील. आम्ही पहिल्यांदा सुजय विखेंना पक्षात घेतलं, त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलही पक्षात आले. वैभव पिचड यांच्या मागोमाग मधुकर पिचड आले आणि आता संदीप नाईक यांच्या पाठोपाठ लवकरच गणेश नाईकही भाजपामध्ये येतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
मंदाताई आणि चित्राताई या महिला नेत्या भाजपामध्ये आल्यानं भाजपातलं महिला संघटन आता आणखी मजबूत होईल. चित्राताईंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पवारासाहेबांना त्यांच्यावर बोलावं लागलं. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात झाले नसते तर महाराष्ट्र कधीच पुरोगामी झाला नसता. त्यांच्या वंशज नीता होले यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.